दबंगांनी साधला डाव...
मानवी तस्करीने शहरावर घाव !!
कोरोना संसर्गाचा शहरात झालेला शिरकाव हा मानवी तस्करीचा प्रकार होता. विमानतळ, रेल्वे, बस सेवा बंद असताना आणि महामार्गावर शासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत असताना शहरात रुग्ण संख्या वाढली कशी ? याचे मुख्य कारण म्हणजे दबंगांनी केलेली मानवी तस्करी !
विदेश प्रवास करून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली हे शहरातील पहिले उदाहरण. विमानतळ बंद केल्याने आता आपल्याला धोका नाही असे सरकारी यंत्रणा ठामपणे सांगू लागली. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आता कोरोना शहरात शिरणार नाही, अशा वल्गना ही झाल्यात. तरीही चक्क रुग्णवाहिकेतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात दाखल झाला. हे प्रकरण उघड तरी झाले मानवी तस्करीची अशी हजारो प्रकरणे रात्रीच्या काळोखात गडप झाली. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा अशा लेबल लावलेल्या हजारो गाड्या शहरात दाखल होत होत्या. किराणा मालाची वाहतूक करण्याच्या नावाखाली भल्या मोठ्या ट्रकमधून मानवी तस्करी झाली. सुरक्षा यंत्रणेच्या नाकावर टिच्चून संसर्ग ग्रस्त अहमदनगर, जळगाव यासह पुणे-मुंबईसारख्या शहरातून माणसे दाखल होत होती. शहरवासीय घरात बसून संसर्ग आटोक्यात येण्याची प्रार्थना करत असताना यंत्रणेतील सडक्या काद्यांनी सारे मुसळ केरात टाकले. हीच बाहेरुन आलेली मंडळी मग रस्त्यातल्या गर्दीत मिसळली. गजबजलेल्या भाजी मंडईत संसर्गाची लागन होत राहिली. कठोर संचार बंदीची अंमलबजावणी करताना यंत्रणा रस्त्यावरील गर्दी कमी करू शकली नाही. पहिल्या तीन लॉक डाऊनच्या काळात शहरात मार्केट हाऊस फुल्ल राहिले. परिणामी संसर्ग वाढत गेला. एकीकडे घरात बसा असे आवाहन करून सरकारने सगळे उपलब्ध मनुष्यबळ मोडीत काढले. आणि मोजक्याच मनुष्यबळावर चालणाऱ्या आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागाला दिवस-रात्र कामाला जुंपले. परिणामी या यंत्रणेवर प्रचंड दबाव आला. वाढलेला कामाचा ताण आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे कामातील गुणवत्ता ढासळली. याही काळात यंत्रणेतील भ्रष्ट केले वळवळत राहिले आणि शहरात संसर्गाचा प्रवास सुखकर झाला.
तो रडत रडत म्हणाला, आम्ही घरातच मरून जाऊ !
प्रशासन कितीही दावे करीत असले तरी आरोग्य यंत्रणेत प्रचंड गोंधळ आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्याचा बागुलबुवा उभा करीत माध्यमांचीही मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारने यंत्रणेतील त्रुटी चव्हाट्यावर येऊच नये याची पुरेपूर खबरदारी घेतली. एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत सबकुछ प्रशासन हीच स्थिती होती. तक्रार करण्याची, गाऱ्हाणे मांडण्याची सोयच नव्हती. जगण्या-मरण्याचाचे सगळे प्रश्न कोरोनात न्हावून निघाले होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील घटना. संजय नगरातील एक महिला पॉझिटिव्ह निघाली. आरोग्य यंत्रणेने तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र घरातील चौघांचा स्वब घेतला नाही. तुम्ही घराबाहेर पडू नका, एवढाच निरोप देऊन आरोग्य यंत्रणा गायब झाली. तीन चार दिवसानंतर घरातल्या एकेकाला ताप येऊ लागला. चौघेही तापाने फणफणले. आई रुग्णालयात तर घरी कुटुंबीय तापाने फणफणले. अशा परिस्थितीत कुणाला सांगावे काही कळेना. शेवटी त्या तरुणाने एका पत्रकाराला फोन केला, रडत रडतच तो म्हणाला, आम्हाला रुग्णालयात दाखल केले नाही तर आम्ही घरातच मरू !!!